‘फडणवीस १ दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर गेले, आता मुख्यमंत्र्यांनी किमान १ तासासाठी तरी यावं !’

0
28

जळगाव (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

पुणे : तौक्ते चक्रीवादळाने केरळ, गोवा आणि महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. यानंतर, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोकणात धावता दौरा केला होता. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि जळगावमध्ये देखील मोठं नुकसान झालं आहे.

जळगावातील केळीच्या बागांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला असून केळीची झाडे मोठ्या प्रमाणात आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यामुळे कोकण दौऱ्याचा ज्याप्रमाणे आढावा घेतला तसाच फडणवीसांनी जळगाव मधील नुकसानाचा देखील आढावा घ्यावा अशी मागणी केली जात होती. आज देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी मुक्ताईनगरपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

यावेळी ते शेतीची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेत असून भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘जळगावच्या शेतकऱ्यांची मागणी वाढत होती की, ज्याप्रमाणे फडणवीसांनी कोकणाचा तीन दिवसीय आढावा घेतला तसा किमान जळगावचा एकदिवसीय दौरा करावा. म्हणजे ज्याप्रमाणे फडणवीसांच्या तीन दिवसीय दौऱ्यानंतर मुख्यमंत्री कोकणात तीन तासांसाठी गेले, तसंच फडणवीस एक दिवसीय दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर किमान ते एक तास तरी दौऱ्यासाठी येतील,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.