Thursday, June 17, 2021
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रराज्यातील 'या' दोन जिल्ह्यांत ग्राहकांनीच महावितरणला दिला शॉक!

राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत ग्राहकांनीच महावितरणला दिला शॉक!

कोल्हापूर: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे साडे नऊ लाख ग्राहकांकडे ‘ महावितरण ‘च्या वीज बिलाची तब्बल ६६५ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. या वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ होत नाही, तोपर्यंत बिल भरणार नाही, अशी भूमिका या भागातील नागरिकांनी घेतल्याने थकबाकी वाढतच चालली आहे. यामुळे महावितरणच्या अर्थकारणालाच शॉक बसला आहे. ( Sangli Kolhapur Electricity Bill Outstanding Update )

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत घरगुती ८ लाख २४ हजार ग्राहकांकडे सर्वाधिक २२९ कोटी ७२ लाख तर वाणिज्य वीज वापर असलेल्या ८७ हजार ग्राहकांकडे ५६ कोटी ६२ लक्ष रुपये , औद्योगिक २७ हजार ग्राहकांकडे ९१ कोटींची थकबाकी आहे. याशिवाय पथदिवे १६६ कोटी, पाणी पुरवठा १०९ कोटी तर सार्वजनिक सेवेचे सहा कोटी थकले आहेत. सांगली जिल्ह्यातील पाच लाखांवर ग्राहकांकडे ४०३ कोटीची थकबाकी आहे. गेले वर्षभर बिल भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत आहे. मागील वर्षात एप्रिल, मे व जून महिन्यातील वीजबिल माफ करावे अन्यथा थकबाकी भरणार नाही, अशी भूमिका या भागातील नागरिकांनी घेतली आहे. यामुळे वर्ष उलटले तरी अनेकांनी थकबाकी भरली नाही. थकबाकी न भरल्यास कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यालाही जोरदार विरोध करण्यात आला. कनेक्शन कापायला याच, मग दाखवतो, असा इशारा दिला गेल्याने कारवाईची मोहीम थांबविण्यात आली. यामुळे दरमहा थकबाकी वाढतच आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी नुकतीच कोल्हापूर परिमंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत वीजग्राहकांशी संपर्क साधून थकबाकी भरण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना नाळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या. सदरच्या आढावा बैठकीस मुख्य अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्यासह विभाग, उपविभाग व शाखास्तरावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महावितरणची विनंती

करोना व तौत्के चक्रीवादळासारख्या आपत्तीशी सामना करीत वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी महावितरणची यंत्रणा अविश्रांतपणे राबते आहे. येत्या मान्सून काळात अखंडित वीजसेवेसाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र वीज बिले थकल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. वीजसेवेचा दैनंदिन कारभार सुरळीत चालण्यासाठी वीजग्राहकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. तेव्हा वीजग्राहकांनी थकीत व चालू वीज बिल भरून महावितरणला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन अंकुश नाळे यांनी केले आहे.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW