Pune : पेट्रोल पंप परवान्याचं अमिष दाखवून व्यावसायिकाला 7 लाखाचा गंडा; ऑनलाईन फसवणुकीचा बळी

0
12

नवी दिल्ली, 10 जून : (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांना गंडा घालत असल्याचं उघडकीस येत आहे. याबाबत सायबर क्राईम पोलीस तसंच बँका, सरकार वारंवार सावधगिरीचा इशारा देत असतात. बँका कधीही तुमचे पिन क्रमांक, पासवर्ड मागत नाही. त्यामुळे बँकेचं नाव सांगून कोणतीही अनोळखी व्यक्तीं कॉल करून माहिती मागत असेल, तर देऊ नका. बँक डीटेल्स, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पिन क्रमांक कोणालाही देऊ नका. सुरक्षित नसलेल्या वेबसाईटवर आपली माहिती भरू नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, याद्वारे हकॅर्स तुमचा डेटा मिळवून तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात. अशा अनेक सूचना सतत दिल्या जात असतात. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात, रोज नवनवीन लोक या भामट्यांच्या सापळ्यात अडकतात आणि आपलं नुकसान करून घेतात.

अशीच एक ऑनलाईन फसवणुकीची घटना नुकतीच पुण्यात (Pune) घडली आहे. एका व्यावसायिकाला पेट्रोल पंप परवाना (Petrol Pump License) मिळवून देण्याचं आमिष दाखवून 7 लाख 80 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. स्वामिनाथन सिंग असं या व्यावसायिकाचं नाव असून, त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, पुण्यातील 49 वर्षीय व्यावसायिक स्वामीनाथन सिंग यांनी पेट्रोल पंप परवाना मिळवण्यासाठी एका वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यामध्ये त्यांनी आपली सगळी माहिती दिली होती. बरेच दिवस त्या वेबसाईटकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, मात्र राकेश मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने त्यांना फोन केला. डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत राकेश मिश्रा याने सिंग यांना वारंवार फोन केले आणि पेट्रोल पंप परवाना मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

दोघांदरम्यान व्हॉटसअपवरही अनेकदा संभाषण झालं. राकेश मिश्रा याने सिक्युरिटी डिपॉजिट आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी केली. वेळोवेळी तो सिंग यांच्याकडे पैसे मागत राहिला. त्याच्या सांगण्यावरून सिंग यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी मिळून तब्बल 7 लाख 80 हजार 600 रुपये जमा केले. त्यानंतर मिश्राकडून सांगितल्याप्रमाणे काहीही कागदपत्रं मिळत नसल्याने स्वामीनाथन सिंग यांना संशय आला आणि फसवलो गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.


Source link