
अमरावती – मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र ही बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात झालेल्या हमरीतुमरीमुळे वादळी ठरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत टाकावी या मागणीसाठी ठराव करावा अशी आग्रही मागणी केली. मात्र रवी राणा आक्रमतेने मागणी करत होते. यावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हळू बोलण्याची सूचना रवी राणांना केली. पण, रवी राणा यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली.
बैठकीतच रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात हमरीतुमरी pic.twitter.com/DE0IjQFby2
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 18, 2021
मी आमदार आहे, मी बोलतोय इथं असं म्हणत रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीआधी काही मदत मिळणार की नाही, असा थेट सवाल केला. मात्र रवी राणा शांततेने बोलत नसल्याचे पाहून यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. त्यांनी हळू आवाजात बोला असं सांगितलं, बोट दाखवून बोलू नका मी असही ठाकूर यांनी सुचित केलं. मात्र तरी रवी राणा यांनी न ऐकल्यामुळे ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांना बोलवावे असे फर्मान सोडले. तसेच रवी राणा केवळ नौटकी करत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.