यवतमाळ : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
पेरणीचा हंगामात बोगस बियाणांचा सुळसुळाट काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला असून बियाण्यांचा अधिकृत साठा जप्त करत संजय मोहनलाल मालानी (५४) रा. बोरीअरब याच्यावर कारवाई करून गोदाम सील केले आहे.
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये शुक्रवारी ४ जून रोजी सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान पुणे, यवतमाळ व दारव्हा येथील कृषी विभागाच्या पथकाने
धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये छापा टाकला. यामध्ये अवैधरित्या बियाणे तयार केले जात असल्याचं उघडकीस आलं आहे.
कशी होती शेतकऱ्यांची फसवणूक?
खुल्या बाजारातून सोयाबीन, तूर, चणा आणायचा आणि मशीनमधून छाटणी करून बॅग भरायची आणि तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची, असा प्रकार या गुन्हेगारांकडून केला जातो. कमी दरात बियाणे मिळत असल्याच्या आशेपोटी शेतकरी हे बियाणे खरेदी करत होते. मात्र, या बियाण्यांचा भंडाफोड शुक्रवारी झाला.
कृषी विभागाच्या पथकाला या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती. कारवाईच्या दृष्टीने तीन पथके तयार करण्यात आली. एकाचवेळी या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० क्विंटल सोयाबीन व तूर बियाणे, ६६०.५ क्विंटल लूज सोयाबीन, एक हजार ७७९ क्विंटल लूज तूर, दोन हजार ७०० क्विंटल लूज चणा आणि ट्रकमधून २५० क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले.
या सर्व मालाची किंमत ४ कोटी २० लाख रूपये असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले. दारव्हा पोलिस स्टेशनला पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव दत्तात्रय शिंदे (३९) यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय मोहनलाल मालाणी यांच्यावर भादंवि ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१ कलमान्वये तसेच सहकलम ७ ए, ७ बी, ७ सी, ७ डी बीज अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.