हायलाइट्स:
- महसुली खटल्यांची सुनावणी आता ऑनलाइन
- वादी आणि प्रतिवादी यांना सुनावणीसाठी लिंक पाठवण्यात येणार
- करोनामुळे ऑनलाइन सुनावणीचा निर्णय
पुणे (वृत्तसंस्था) | शासननामा न्यूज ऑनलाईन
करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या महसुली खटल्यांची सुनावणी आता ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रलंबित असलेले जमिनीचे वाद हे ऑनलाइन सुनावणी घेऊन निकाली काढले जाणार आहेत.
महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमांतर्गत महसुली खटल्यांच्या सुनावणी या जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासमोर होत असतात. मात्र, करोनामुळे एप्रिल महिन्यापासून या सुनावणी स्थगित करण्यात आल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी ऑनलाइन घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले की, ‘महसुली दावे निकाली काढण्यासाठी यापूर्वी प्रतिदिन सरासरी ३० सुनावणी घेण्यात येत होत्या. मात्र, करोनामुळे या सुनावणी स्थगित करण्यात आल्या आहेत. आता या सुनावणी ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार वादी आणि प्रतिवादी यांना सुनावणीसाठी लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यावर संबंधितांनी सहभागी झाल्यानंतर सुनावणी घेऊन खटले निकाली काढले जाणार आहेत.’
तक्रारींची सुनावणी ही तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी या स्तरावर होत असते. त्यांनी दिलेल्या निकालाविरूद्ध अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करण्याची तरतूद आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी हे खटल्यांची सुनावणी घेत असतात. मात्र, करोनामुळे या खटल्यांच्या सुनावणी स्थगित करण्यात आल्या आहेत. त्या आता ऑनलाइन होणार असल्याने संबंधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, करोनामुळे महसुली खटले प्रलंबित असल्याची संख्या वाढली आहे. काही खटल्यांमध्ये वादी आणि प्रतिवादी यापैकी कोणीही अनेक वर्षांपासून सुनावणीसाठी हजर रहात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर्षानवर्षे प्रलंबित असलले महसुली दावे हे निकाली काढण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जाणार असून, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास असे खटले हे कामकाजातून वगळण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.