Home महाराष्ट्र शिवसेना-भाजपमधील शाब्दिक चकमक वाघावरून ‘बकरी’पर्यंत

शिवसेना-भाजपमधील शाब्दिक चकमक वाघावरून ‘बकरी’पर्यंत

0
शिवसेना-भाजपमधील शाब्दिक चकमक वाघावरून ‘बकरी’पर्यंत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यानं यात भर पडली होती. मात्र, पाटलांचं तेच वक्तव्य आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय टीका-टिप्पणीला कारणीभूत ठरलं आहे. (Nilesh Rane Taunts Sanjay Raut)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांच्यात स्वतंत्र चर्चाही झाली होती. त्यातून भाजप-शिवसेनेच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या. त्याबद्दल विचारलं असता, ‘मोदींनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली होती. ‘वाघाशी मैत्री करायला तयार आहे असं चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो,’ असा चिमटा त्यांनी काढला होता.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आता माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीट केलं आहे. ‘नाक्यावरती उभे राहणारे टपोरी सुद्धा स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ होता आले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची,’ अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

Nilesh-Rane

चंद्रकांत पाटील म्हणाले…

राऊत यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनीही टोला हाणला आहे. ‘आम्ही मैत्री करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. वाघाचे म्हणाल तर आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर होता, तोपर्यंत आमची मैत्री होती,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here