यवतमाळ : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यालाही आज पावसाने झोडपून काढलं आहे. मात्र यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कळंब तालुक्यातील सावरगाव येथे अंगावर वीज कोसळून गजानन घोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर यवतमाळ तालुक्यातील किन्ही येथील अशोक व्यवहारे (५५) यांचाही वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तसेच दारव्हा तालुक्यातील कुंभारकिनी येथील शेतकरी आकाश जाधव (२८) यांच्या अंगावर वीज पडून तेही जागीच ठार झाले.
यवतमाळला पावसाने झोपडलं; कोणत्या तालुक्यात किती पाऊस?
जिल्ह्यात दुपारी २ वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारची वेळ असूनही सर्वत्र अंधार झाल्याचे दृश्य दिसून आले. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना हेडलाईट लावावे लागले होते.
यवतमाळ जिल्ह्यात बुधवार, ९ जून रोजी चांगला पाऊस बरसला. बुधवारी सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात ३७.९ मिमी इतका कोसळला. त्या खालोखाल पुसदमध्ये ३३.७ मिमी, महागावमध्ये २२ मिमी, तर यवतमाळ तालुक्यात २४.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात आज गुरूवारीही दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा अंदाज आहे. पार्डी येथील नाल्याला पूर आल्यामुळे पार्डी ते जांबबाजार रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.