मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये,’ अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली आहे. (Raj Thackeray To Not Celebrate His Birthday)
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं सविस्तर पत्रच ट्वीट केलं आहे. ‘मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. करोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठले असले तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळं माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथं आहात, तिथं सुरक्षित रहा. कुटुंबीयांची व आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमानं याल आणि आपली भेट होणार नाही असं होऊ नये,’ असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.
करोना काळाता मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचंही राज यांनी कौतुक केलं आहे. ‘असंच काम करत राहा. अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. आपल्या पक्षातील कितीतरी जण आपल्याला सोडून गेले आहेत. कुणाचे रोजगार गेले आहेत. त्या सर्वांना धीर द्या. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा,’ असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे!
थोड्याच दिवसांत कार्यकर्त्यांना भेटण्याचं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. ‘पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमाविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यासाठी लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत आहात तिथंच पूर्ण काळजी घेऊन राहा. समाजोपयोगी काम करत राहा. त्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत,’ असंही राज ठाकरे यांनी शेवटी म्हटलं आहे.