
पुणे : महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा (Pandharpur Ashadi Wari 2021) यंदाही करोनाच्या संकटात असणार आहे. कारण, यंदा फक्त दहा मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते पुण्यात (Pune) वारीसंदर्भात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायी वारीसाठी यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. इतकंच नाहीतर पायी वारीवरून आता राजकारण करू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ज्या मनाच्या दहा महत्वाच्या पालखी आहेत त्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली. या पालख्यांना बसमधून जाण्यासाठी २० बसेस देण्यात येणार असल्याचंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.
गेल्या वर्षीही करोनाच्या धोक्यामुळे पायी वारी रद्द करून साध्या पद्धतीने वारी सोहळा पार पडला. यंदाही प्रत्येक पालखीसाठी 40 वारकऱ्यांना परवानगी असून गेल्या वर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाहूनच पालखी सोहळा पार पडेल असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर रिंगण आणि रथोस्तवासाठी पंधरा वारकऱ्यांना परवानगी आहे. पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे देहू आणि आळंदीतून होतं. यावेळी शंभर वारकरीच उपस्थित राहतील अशी माहिती अजित पवारांनी दिली.