जळगाव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका कायम सामंजस्याची व संयमाची असते. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी ते केंद्रापुढे विनम्रतेने झुकायला तयार असतात. मराठा आरक्षण आणि मुंबईतील मेट्रो कारशेड हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली असेल तर यात नरमणे कुठे आले?, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. ( Sanjay Raut on CM Thackeray PM Modi Meeting )
संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज चोपडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान भेट, विरोधकांनी शिवसेनेवर केलेली टीका या विषयांवर भाष्य केले. ‘मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवत असतो. वाघ हा वाघ असतो. मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे. हिम्मत असेल तर या पिंजऱ्यात’, अशा शब्दांत राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पवारांचे आघाडीबाबतचे सुतोवाच ही जनतेची भावना
शरद पवार हे या सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केले आहे ती या राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका या एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची असेल तर पवारसाहेब जे सांगत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. नाना पटोले स्वबळावर निवडणुका लढू असे म्हणत असतील तर त्याचे स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, नरेंद्र मोदींना आव्हान उभे करणार असतील व काँग्रेसचा पंतप्रधान होणार असेल तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
शिवसेना नरमली नाही
शिवसेना नरमली नाही. एकीकडे शिवसेनेला वाघ म्हणतात, नंतर नरमली म्हणतात. मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांना भेटले. राज्याच्या विकासाला गती मिळावी म्हणून केंद्राच्या अखत्यारितील जे प्रश्न असतात, त्यांच्यासाठी कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असो त्यांना पंतप्रधानांना भेटावे लागते. मी तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पंतप्रधानांची दिल्लीत जाऊन भेट घेऊन हा संघर्ष थांबवायला सांगितल्याचीही राऊत यांनी आठवण करून दिली. राज्यातील सरकारने दीड वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. आता उर्वरित साडेतीन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील, तसेच सरकार हे तीन पक्षांचेच असेल. निवडणुका या ठरलेल्या वेळेतच होणार, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हा महासागर आहे. त्यामुळे अनेकांना यात यावेसे वाटते. या महासागरात अनेकांना आपल्या नौका घालव्याशा वाटतात, असे विधानही राऊत यांनी केले. राज्यपाल नियुक्त बारा आमादार निवडीची प्रकीया प्रलंबित असल्याचे विचारले असता, तुम्हीच जळगाव जिल्ह्यात राज्यपालांना बोलवा आणि विचारा, त्या बारा जणांमध्ये तुमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीसाठी दौरा
खासदार राऊत म्हणाले की, राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे. शिवसैनिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा असल्याचेही शेवटी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.