यामुळे तुमच्या नात्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि वैवाहित जीवनही आनंदी राहते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान उत्कृष्ट अभिनेत्यासह परफेक्ट पती म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच शाहरुख-गौरीच्या नात्यात आजही खूप प्रेम पाहायला मिळतं. शाहरुख पत्नीला घरातील कामांमध्ये कशा पद्धतीने मदत करतो? तिची कशी काळजी घेतो? जाणून घ्या सविस्तर…
’मी स्वयंपाक करतो, मुलांनाही सांभाळतो’
शाहरुख अनेकदा सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. चाहतेमंडळी त्याला खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारत असतात. असेच एका युजरेनं त्याला ट्विटरवर प्रश्न विचारला की, ‘गौरीला तुमच्यामधील सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती?’ किंग खानने यावर उत्तर दिलं की, ‘मी स्वयंपाक करतो, घर स्वच्छ ठेवतो आणि मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळतो’.
यावरून अभिनेत्यानं करिअरव्यतिरिक्त कुटुंब सांभाळण्याबाबत जी माहिती दिली त्यावरून हेच स्पष्टपणे दिसतंय की त्याचे गौरीवर जिवापाड प्रेम आणि तिच्याबद्दल प्रचंड आदरही आहे.
पत्नीचा आधारस्तंभ व्हा!
घरातील कामांमध्ये पतीनं आपल्या पत्नीची मदत करणे म्हणजे ही आदर्श पतीचे लक्षणे आहेत. घराची देखभाल करणे ही पती-पत्नी दोघांची जबाबदारी. जोडीदाराकडून पाठिंबा मिळाल्यास महिलांना आनंद होतोच शिवाय त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदरही अधिक वाढतो.
प्रत्येक पुरुषानं शाहरुखकडून याबाबतीत प्रेरणा घ्यावी आणि घरातील कामांमध्ये आपल्या पत्नीला मदत करावी. पत्नीची मदत केल्यानं तिच्या खांद्यावरील कामाचे ओझं हलके होईल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. सोबतच तुम्ही घरातील समस्या किती चांगल्या प्रकारे समजून घेत आहात, हे देखील तुमच्या पत्नीला कळेल.
महिलांप्रति दिसतो आदर
आजही कित्येक कुटुंबांमध्ये घरातील काम केवळ महिलांनीच करावीत, ही त्यांचीच जबाबदारी असते, असे मानले जाते. अर्थात पूर्वीपासून महिलांवरच घर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आलीय आणि उत्तमरित्या त्यांनी हे काम पार सुद्धा पाडलं. बदलत्या काळानुसार चूल-मूल आणि ऑफिसमधील कामही सांभाळलं. पण एक जोडीदार म्हणून पतीनंही पत्नीची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यानं घरातील काम करणारं यंत्र म्हणून पत्नीकडे पाहू नये.
घरगुती कामांमध्ये पत्नीला मदत करणं वाईट गोष्ट अजिबात नाहीय. उलट तुम्ही पत्नीला मदत केल्यास तिच्यावरील कामांचा ताण कमी होईल. तसंच सारंकाही एकट्याने करणाऱ्या तुमच्या पत्नीच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होणार नाही.
मुलांनाही चांगली शिकवण मिळते
मुलांच्या आयुष्यातील पहिले गुरू आई-वडील असतात, हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल. लहानपणापासून मुलगा/मुलगी आपल्या आई-वडिलांचे वर्तन पाहतच बऱ्याच गोष्टी शिकतात, मोठे होतात. जेव्हा मुले आपल्या वडिलांना घरातील कामांपासून दूर पळताना पाहतात आणि आई ऑफिससह घरातील कामही योग्य पद्धतीने पार पाडत असल्याचे त्यांना दिसतं.
तेव्हा मुलगा – मुलीची कामं विभागलेली आहेत, हेच विचार त्यांच्या मनात पक्के होतात. जर आपण प्रत्येक गोष्टीत पत्नीला पूर्ण पाठिंबा दिला, तिच्या आनंदाची काळजी घेतली तर मुलांनाही याद्वारे चांगले वळण लागेल. महत्त्वाचे म्हणजे भावी पिढी उत्तमरित्या घडेल.