
परभणी : नाशिक येथील ७१ वर्षीय व्यक्तीच्या शरीराला धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला. करोनाची लस (Corona Vaccine) घेतल्यानंतरच असा प्रकार झाल्याचा दावा सदर व्यक्तीकडून करण्यात आला. त्यानंतर आता परभणीतही अशीच घटना घडली आहे. लस घेतल्यानंतर मलाही तसाच अनुभव आल्याचा दावा परभणी येथील ४१ वर्षीय गजानन पाटेकर यांनी केला आहे.
गजानन पाटेकर यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या शरीराकडे धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षित होत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे, हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.
ऑप्टिकल या व्यवसायात असलेले गजानन पाटेकर यांनी ७ मे रोजी करोनाची ‘कोविशील्ड’ ही लस घेतली आहे. गुरुवारी नाशिक येथील अरविंद सोनार या ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला धातूची नाणी आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याची बातमी पाटेकर यांनी पाहिली. त्यानंतर सहज म्हणून त्यांनी सुद्धा हा प्रयोग स्वतःवर करून पाहिला. तेव्हा त्यांनी देखील स्वतःच्या शरीराला काही नाणे लावून पाहिले तर ते चिटकत असल्याचं लक्षात आलं.
…पण करोनाची लस घ्याच, पाटेकर यांचं आवाहन
पाटेकर यांनी काही स्टीलच्या वस्तू देखील शरीराला लावून पाहिल्या, त्यादेखील चिटकल्या. शिवाय चाव्याही चिटकत होत्या. हा प्रकार त्यांना स्वतःलाही गोंधळून टाकणारा ठरत असला तरी लस घेणे काळाची गरज आहे आणि सर्वांनी लस जरूर घ्यावी, असं आवाहनही पाटेकर यांनी केलं आहे.