अहमदनगर: शहरातील रस्ते आणि चौकांचे नामकरण हा तसा संवेदनशील विषय असतो. शक्यतो महापुरुष किंवा नेत्यांची नावे देण्यावर भर असतो. पाथर्डी तालुक्यात मात्र एका चौकाला सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याचे नाव देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी सी. डी. फकीर यांचे नाव पाथर्डी शहरातील अंजठा चौकाला देण्यात आले आहे. फकीर मूळचे पाथर्डी तालुक्यातील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. (social activists named the circle in pathardi taluka after a government official)
पाथर्डी शहर व तालुक्यातील सामाजिकक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या अजंठा चौकाला फकीर यांचे नाव देण्यात आले. माधवबाबा यांच्या हस्ते नामकरण कार्यक्रमही झाला. सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. अर्थात यावर अहमदनगर परिषदेकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची प्रक्रिया झालेली नाही.
या चौकाला फकीर यांचे नाव का दिले याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे म्हणाले, ‘पाथर्डी तालुक्यात झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचे जनक म्हणून फकीर यांचे नाव आदराने घेतले जाते. ते सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर तीन वर्षे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देशात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला आणून एक विक्रम प्रस्थापित केला होता.’
प्रा. सुनील पाखरे म्हणाले, ‘तालुक्यातील सर्व देवस्थानांना जोडणारे रस्ते फकीर यांच्या प्रयत्नाने झाले. पाथर्डी तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जावा यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत मंजूर केला आणि तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणले.’
यापुढे हा चौक टसी. डी. फकीर साहेब चौक या नावाने ओळखला जावा व यातून त्यांची व पाथर्डीची नाळ जोडलेली राहील, अशी अपेक्षा माधव बाबांनी व्यक्त केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किसनराव आव्हाड, अॕड. हरिहर गर्जे, मुकुंदभैय्या गर्जे, नागनाथजी गर्जे, देवा पवार, अक्रम आतार, तनवीर आतार, हाजी हुमायून आतार, जब्बारभाई आतार, गोरख पवार, अस्लम मणियार, पांडुरंग भिसे, शफीक आतार, बहादूर आतार, फिरोज आतार उपस्थित होते.