पुणे, 13 जून : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, मुंबईत (Mumbai) अजूनही लोकल सेवा (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. पुढील 8 दिवसांत परिस्थितीत बघून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar ) यांनी दिली. तसंच, ओबीसी नेत्यांचे लोणावळ्यात 26 जून रोजी शिबिर आयोजित केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुण्यात ओबीसी आरक्षणाबाबत बैठक पार पडली. नुकतंच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. राज्यातील ओबीसी नेते, मंत्री विजय वडेट्टीवार, बाळासाहेब सानप व इतर नेते बैठकीला उपस्थित होते. ओबीसी समाजाची जनगणना केली जावी अशी मुख्य मागणी आहे.