मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमीन भुसभुशीत झालेली आहे. ही कार जेथे उभी होती तिथे तिच्या समोरच पावसामुळे मोठा खड्डा तयार झाला होता. या खड्ड्यात पाणीही साचलेले होते. हा खड्डा मोठा होत गेल्याने ही कार त्या खड्ड्यात सरकली. मात्र या कारची पुढील चाकेच किंवा पुढील इंजिनचा भागच तेवढा खड्ड्यात जाईल असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र तसे न होता ही कार पूर्णपणे खड्ड्यात बुडून केवळ पाणीच दिसू लागले. यावरून हा खड्डा किती खोल होता हे स्पष्ट होते.
हा धक्कादायक प्रकार घाटकोपर पश्चिम येथील कामालेन परिसरात असलेल्या रामनिवास सोसायटीतील पार्किंगच्या जागेत घडला. येथे कारपुढील जमीन खचली आणि तेथे मोठा खड्डा तयार झाला. त्यानंतर ही कार या खड्ड्यात पूर्णपणे बुडाली.
किरिट सोमय्यांचा महापालिकेवर निशाणा
दरम्यान, मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरून भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर जोरदार टीका करू लागला आहे. तोच धागा पकडत भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी कार बुडाल्याच्या व्हायरल व्हिडिओवरून निशाणा साधला आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरले आहे. सोमय्या यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हीच का मुंबईची नालेसफाई?, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.