कोल्हापूरः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात आज छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. मराठा आरक्षणावरुन सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत त्यामुळं अजित पवार व शाहू महाराजांच्या भेटीमुळं चर्चेला उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली यावर छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खासदार संभाजीराजे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. तसंच, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजे यांचे सतत केलेले कौतुक या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांची भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. शाहू महाराज व अजित पवार यांच्यात एक तास बैठक सुरु होती.
‘अजित पवार व आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली आहे. समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा असं मार्गदर्शन केलं आहे, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. तसंच, या भेटीबद्दल अजित पवार सविस्तर सांगतील,’ असंही छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी सांगितलं आहे.
‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. तसंच, आंदोलनाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही,’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
‘केंद्र सरकारने लक्ष दिलं आणि त्यांना रस असला कर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,’ असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही. जे शक्य आणि व्यवहार्य असेल ते आम्हाला द्या. ठाकरे सरकारनं जे प्रयत्न सुरू केलेत ते समाधानकारक आहेत. कोर्टानं दिलेला निकाल खोडून काढणं आणि फेरविचार याचिका दाखल करणं या गोष्टी सरकारनं तातडीनं कराव्यात,’ असंही शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.