अमरावतीः काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा रणरागिणी असा उल्लेख करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
नाना पटोले सध्या विदर्भ दौऱ्यावर असून मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. त्यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांची कौतुक केलं आहे. तसंच, जनतेच्या प्रश्नासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून जायलाही पुढे-मागे पाहत नाही, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
‘यशोमती ठाकूर रणरागिणी आहेत. विधानसभेत मी त्यांना अनेक वर्ष पाहिलंय. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रणरागिणी आहेत. वेळ आली तर तुमच्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
‘आपला उमेदवार यापूर्वीपेक्षा अधिक मतांनी निवडून आला पाहिजे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. मला महाराष्ट्रभर हा पॅटर्न लागू करायचा आहे. महिनाभरात हा पॅटर्न लागू करण्याचा विचार करतोय. मला अपेक्षा आहे की तिवसा मतदारसंघाचा पॅटर्नच राज्यभर लागू होणार आणि त्यासाठी तुमचा सहभाग हवा,’ असं आवाहन नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल,’ असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.