महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बेस्ट सीएम आहेत, की नाही माहिती नाही… पण सर्वांत आनंदी सीएम असण्याची नक्कीच शक्यता आहे. कारण ज्या वेळी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला सुरूंग लावण्याचा डाव त्यांच्याच दुसऱ्या मित्र पक्षात शिजत आहे,
त्याचवेळी त्यांच्या तिसऱ्या मित्र पक्षाचे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपली रिंग टाकून उतरले आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला सुरूंग लावण्याऐवजी आपल्याच पक्षाच्या भावी मुख्यमंत्रीण बाईंना राजकीय फाऊल होतो की काय, या शक्यतेने उध्दव ठाकरेंचा दुसरा मित्र पक्ष धास्तावला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघडपणे काँग्रेस पक्ष विधानभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवेल आणि काँग्रेसश्रेष्ठी तयार असतील, तर आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्हायला तयार आहोत, असे सांगितले आहे.
वर वर पाहता हे विद्यमान मुख्यमंत्र्यांना म्हणजे उध्दव ठाकरे यांना आव्हान जरूर वाटेल पण प्रत्यक्षात ते आव्हान नानांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पुढे उभे केल्याचे जाणवते. तशी राजकीय वर्तुळात चर्चा देखील आहे आणि ती खरी आहे.
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडे राहील हे कबूल केले आहे. राष्ट्रवादीला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची कमिटमेंट दिलेली नाही, असे कालच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशकात येऊन सांगितले.
आपल्या विधानाला आधार म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणाचा आधार घेतला. आता शरद पवार स्वतःच हे सरकार ५ वर्षे टिकणार असे सांगत आहेत म्हटल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे राऊतांचे म्हणणे आहे.
पवारांनी ठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार आहे, असे म्हणणे… त्याचा आधार संजय राऊतांनी घेणे या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवून नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या उफाळलेल्या महत्त्वाकांक्षेकडे पाहिले, तर कोणता राजकीय निष्कर्ष निघतो…
नानांचे मुख्यमंत्रीपदाबाबतचे विधान ५ वर्षांनंतरचे आहे, असाच निघतो ना… मग ५ वर्षांनंतर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असेल…?? सुप्रिया सुळेच असण्याची शक्यता आहे ना…?? स्वतः शरद पवारांनी न बोलता दाखविलेली ती शक्यता आहे ना…?? की सुप्रिया सुळे यांची अख्खी कारकीर्द फक्त बारामतीच्या खासदार म्हणूनच पूर्ण व्हावी, असे शरद पवारांना वाटते…??
आणि मग जर राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जर खरेच सुप्रिया सुळे असतील, तर नाना पटोले हे आव्हान कुणाला देत आहेत…?? शरद पवारांच्या मनात असलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्र्यांनाच ना…!! की दुसऱ्या कोणाला…??
उध्दव ठाकरे तर विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ५ वर्षे ते टिकणार हे पवार – राऊतांनी सांगितलेच आहे… म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न तयार होतो तो ५ वर्षांनंतरचा. त्यामध्ये नाना पटोलेंनी उतरून एका झटक्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शर्यत तेज केली आहे.
शिवसेनेकडून उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर काँग्रेसकडून नाना पटोले… अशी तडाखेबंद रेस महाराष्ट्रात होईल… पण तेव्हा महाराष्ट्र लिमिटेड चाणक्य कुठे असतील…??
आपल्या मनातील उमेदवाराला महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मान ते मिळवून देऊ शकतील…?? की त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा पावसात भिजावे लागले…??