मुंबई: राज्यात आज नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात ८ हजार १२९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १४ हजार ७३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात २०० करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 8129 new cases in a day with 14732 patients recovered and 200 deaths today)
आजच्या २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
बुलडाण्यात फक्त ४७ सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १९ हजार ०४७ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २०५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ६८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार १५६ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार २६१ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ३५७ इतकी आहे.
या बरोबरच अहमदनगरमध्ये ४ हजार ५९२ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ७१४, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ३७२ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ०१७, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार १९६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार ५९४ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४७ इतकी आहे.