पुणे, 15 जून: आपल्या देशात आजच्या आधुनिक काळातही तृतीयपंथी, समलिंगी लोकांकडे (LGBTQ) बघण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनात फारसा फरक पडलेला नाही. आजही या लोकांबद्दल समाजाची मानसिकता किती विकृत आहे याची प्रचिती पुण्यासारख्या शहरात एका ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याला येत आहे. अत्यंत दुर्दैवाची अशी ही बाब आहे. ऋषीकेश राऊत उर्फ ऋषी (Rishikesh Raut) 23 वर्षीय नॉन-बायनरी ट्रान्स व्यक्ती सध्या ऑनलाईन ट्रान्सफोबिक गैरवर्तनाचं लक्ष्य ठरली आहे.
मिस्टी (Misty) या संस्थेसोबत गेली पाच वर्षे काम करणाऱ्या ऋषीने जेंडर अफर्मिंग शस्त्रक्रियेसह हार्मोनल थेरपी, लेझर थेरपी अशा काही शस्त्रक्रिया करण्याकरता निधी जमवण्याच्या उद्देशाने ऑनलाईन क्राऊडफंडिंग (Crowd Funding) प्लॅटफॉर्म केट्टोवर (Ketto) एक मोहीम सुरू केली आहे.
खरंतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अशाप्रकारे निधी गोळा करणाऱ्या लोकांना सहानुभूती मिळते. लोक भरभरून मदतही करतात, पण ऋषीला मात्र अतिशय विदारक अनुभव येत आहे. त्याला 7 लाख रुपयांची गरज आहे, त्यापैकी 2 लाख 54 हजार 166 रुपये जमा झाले आहेत.