कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आजपासून कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली. ‘आम्ही बोललो, समाज बोलला आणि तुम्ही बोला’ अशी टॅगलाइन असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडणार आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील आमदार, खासदार व मंत्र्यांनी आज आपली भूमिका मांडली. संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, असं मत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मांडलं. तर, राज्य सरकारची संभाजीराजेंशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं सत्ताधारी नेत्यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापुरात आज सकाळी १० वाजता मूक आंदोलन सुरू झाले. बहुतेक लोक काळ्या कपड्यात आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे आदी यावेळी उपस्थित होते. धैर्यशील माने व चंद्रकांत जाधव हे आजारी असतानाही आंदोलनात सहभागी झाले होते.
‘या आंदोलनात राजकारण होता कामा नये, पंतप्रधानांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळले. हाच समन्वय यापुढेही कायम ठेवून हा प्रश्न मिटवावा, अशी भूमिका जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी मांडली. ‘हा मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा आहे. लोकप्रतिनिधी ताकदीने यात उतरणार आहेत. सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक व्हावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. २८८ आमदार, ४८ खासदारांचा पाठिंबा असताना आरक्षण का मिळत नाही, असा सवाल खासदार माने यांनी केला. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र आणि राज्य हा प्रश्न एकमेकांकडे टोलवत आहे. त्यामुळं हा प्रश्न भिजत पडला आहे, अशी नाराजी प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. संभाजीराजेंनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, त्यातील बहुसंख्य मागण्या राज्य सरकारच्या पातळीवर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारच्या वतीनं राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सतेज पाटील यांनी भूमिका मांडली. ‘आरक्षणासाठी जे जे काही करावे लागेल, ते सर्व करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ही जबाबदारी सरकार पूर्ण करेल, असं यड्रावकर म्हणाले. ‘राज्य सरकार आरक्षण प्रश्नात कुठेही कमी पडलेलं नाही. सर्वानुमते ठराव मान्य केला आहे. राज्य सरकारच्या पातळीवरील जे विषय आहेत, ते सोडवण्यासाठी उद्याच्या उद्या मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि आपण एकत्र बसल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. संभाजीराजेंनी उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी,’ असं सतेज पाटील यांनी सांगितलं.