जालना : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणासह मराठवाड्याच्याही काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. जालना जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले. अशातच जालन्यातील अवघडराव सावंगी येथे एक दुर्घटना घडली असून ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला आहे. सय्यद शायद सय्यद सईद असं सदर तरुणाचं नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव या गावातील परिसरात बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. परिणामी ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. तसंच गावालगत असलेल्या ओढ्यास मोठा पूर आला. हा ओढा पुढे धामना नदीस जाऊन मिळतो.
धाड या गावात मजुरीचे काम करण्यास गेलेले दोन भाऊ सय्यद शायद सय्यद सईद व सय्यद सलीम सय्यद सईद हे पुराच्या पाण्यातून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान येत होते. त्यात सय्यद शायद सय्यद सईद हा तरूण वाहून गेला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक लोक ओढ्याच्या कडेलाच थांबले होते. माात्र सदर दोन तरुणांनी आततायीपण केला आणि दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात एक जण वाहून गेला आहे.
दरम्यान, ही घटना मोबाईल कॅमेर्यात कैद झाली असून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.