संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाइलमध्ये ट्वीट करत असतात. सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना ते व्यंगचित्रे वा शेरोशायरीवर भर असतो. आज राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच १२ आमदारांच्या यादीची आठवण करुन दिली आहे. त्यामुळं राऊत यांच्या ट्वीटवरुन आता चर्चा रंगली आहे.
‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहिल,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसंच, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही राजभवनावर भेट देत राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत.