नवी दिल्ली : भारतातील अॅस्ट्राजेनिकाच्या सहकार्याने ऑक्सफर्डची कोरोना लस तयार करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आता मुलांवर ‘नोव्हावॅक्स’ लसीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. वृत्तसंस्था एएनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मुलांवर नोव्हावॅक्स लसीची चाचणी घेऊ शकते. आधीपासूनच मुलांवर क्लिनिकल ट्रायलची तयारी सुरु होती आणि दिल्ली एम्समध्ये यासाठी स्क्रीनिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट सप्टेंबरपर्यंत देशात नोव्हावॅक्स कोरोना लस उपलब्ध करु शकते अशी आशा आहे.
नोव्हावॅक्सचा चाचणी डेटा आशादायक
महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले आहे की, कोविड 19 विरूद्ध नोव्हावॅक्स लसीच्या परिणामकारकतेची आकडेवारी आशादायक आहे. नीती आयोगाचे सदस्य ( आरोग्य ) व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारुन असं लक्षात येतं की नोव्हावॅक्स ही लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे.
Serum Institute of India plans to start clinical trials of the Novavax shot for children in July: Sources
— ANI (@ANI) June 17, 2021
उपलब्ध आकडेवारीवरून आपण जे पाहात आहोत ते म्हणजे ही लस खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहे. परंतु ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट तयार करेल, हे त्याहून प्रभावी आहे. सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मितीची कामे यापूर्वीच पूर्ण केली आहेत आणि प्रणाली पूर्णत: कार्यान्वित करण्यासाठी चाचण्या घेत आहे, जे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असं व्ही के पॉल यांनी सांगितलं.
नोव्हावॅक्स कंपनीने त्यांची कोरोनावरची लस ही 90 टक्के प्रभावी असल्याचा त्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलनंतर जाहीर केलं होतं. अमेरिकेत या ट्रायल पार पडल्या होत्या. गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी ज्या लशींकडे जगाचं लक्ष होतं, त्यापेकी एक ही नोव्हावॅक्सची लस होती. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर ही लस 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.