औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नापासून ते विकासाच्या निरनिराळ्या प्रश्नांसाठी झोकून देणारे ज्येष्ठ विधिज्ञ तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप गोविंदराव देशमुख (वय ६७) यांचे शुक्रवारी (१८ जून) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यसंस्काराप्रसंगी खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर, खंडपीठ वकील संघाचे सचिव घाटोळ पाटील, बायस आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा विधिज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. (Prominent senior lawyer Pradip Deshmukh passed away)
मूळचे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील रहिवासी असलेले अॅड. देशमुख यांना असलेली मराठवाड्याच्या विकासाची तळमळ पाहून पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी त्यांच्यावर जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्या माध्यमातून अॅड. देशमुख यांनी जायकवाडीला मिळणाऱ्या ८० ते ८२ टीएमसी पाण्याच्या प्रश्नासाठी कडवी झुंज दिली. पाण्यासाठी दिलेल्या लढ्यामुळेच त्यांची ‘पाणीवाले बाबा’ अशीही ओळख झाली होती.
मराठवाड्यातील वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या वाटेला येणाऱ्या अपुऱ्या जागांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची बाजू त्यांनी गोविंदभाई व विजयेंद्र काबरा यांच्या पाठबळाने न्यायालयात प्रभावीरित्या मांडली. त्याचाच परिणाम म्हणून वैद्यकीयच्या १५०, तर अभियांत्रिकीच्या ७५० जागा वाढवून मिळाल्या. सिडकोला अनेक सुविधा मिळतच नसल्याच्या प्रश्नावर दाखल याचिकेवरुन खंडपीठाने अॅड. प्रदीप देशमुख यांच्या नावे आयोग स्थापन करून अहवाल मागवला व त्याआधारे एक स्यूमोटो याचिका दाखल करून घेतली. त्या अनुषंगाने मिळालेल्या आदेशामुळे सिडकोतील रस्ते, संत तुकाराम नाट्यगृह, बॉटनिकल गार्डन, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्न मार्गी लागले.
राजीव गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन अॅड. देशमुख यांनी ‘राजीव गांधी इंटलेक्च्युअल फोरम’चीही स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटन उभे केले. ‘मराठवाड्यातील बलस्थाने आणि दुर्बलता’ हा प्रकल्प हाती घेऊन परभणीचे डॉ. के. के. पाटील यांच्या सहकार्याने मोठा ग्रंथही तयार केला. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा विधिज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.