पुणे, 19 जून : मार्केटमधील मागणी, अभ्यास आणि दर्जेदार उत्पादनावर भर या त्रिसूत्रीनुसार काम करत पुण्यातल्या प्रमोद पानसरे (Pramod Pansare) यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये (Food Industry) चांगली भरारी घेतली आहे. शेवग्याच्या पानापासून (Drumstick leaves chocolate) प्रथम पावडर नंतर चॉकलेट, स्नॅक्स यांसारखे पदार्थ तयार करून, त्यांची विक्री करून ते आता महिन्याला तीन लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने मागील काही वर्षांपासून शेवग्याला (Drumsticks) मागणी वाढत आहे. हे जाणून घेऊन प्रमोद पानसरे यांनी शेवग्याच्या पानांपासून चॉकलेट, चिक्की, खाकरा आणि स्नॅक्स तयार करण्याच्या उद्योग सुरू केला.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 30 वर्षांचे प्रमोद एका सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. शेती हे त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन होते. 2012मध्ये त्यांनी फूड टेक्नोलॉजीमध्ये बी. टेक. केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काही वर्षं त्यांनी खजुराचा व्यवसाय केला. परंतु, त्यात अपेक्षित फायदा न झाल्याने त्यांनी तो बंद केला; मात्र वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते एका फूड कंपनीत नोकरी करू लागले. तिथे तीन वर्षं काम करताना वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली.