[ad_1]
या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी उपयुक्त ठरणारा एक योग प्रकार आणि त्याचे महत्त्व सांगणार आहोत. हा योग प्रकार म्हणजे फेशिअल योग (Facial Yoga). हा योग प्रकार नियमित केल्यामुळे त्वचेला भरपूर फायदे मिळतात. या लेखाच्या आधारे या योग प्रकाराबाबत आपण सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य – Indiatimes/iStock/TOI)
चेहऱ्यामध्ये जाणवेल फरक
वरील दिलेले हे तीन फोटो तुम्ही निरखून पाहा. पहिल्या फोटोमध्ये सैल त्वचा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पहिल्या फोटोपेक्षा सुधार दिसत आहे. त्यापुढील तिसरा फोटो पाहिला तर तुम्हाला मऊ आणि आकर्षक त्वचा पाहायला मिळेल. केवळ फेशिअल योग प्रकारामुळे त्वचेमध्ये घडणारे हे सकारात्मक बदल तुम्हाला दिसत आहेत. नियमित हा योग केल्यामुळे त्वचा घट्ट राहण्यास मदत मिळते. तसेच तुमच्या चेहऱ्याचा आकार देखील बदलतो.
मसल्स वॉर्म-अप
फेशिअल योग सुरू करण्यापूर्वी त्वचेच्या स्नायुंचे वॉर्म-अप करणं खूप महत्त्वाचं आहे. वॉर्म-अप करण्यासाठी शक्य तेवढं तोंड उघडा आणि जीभ बाहेर काढा. तसेच शक्य तितके डोळे देखील रुंद उघडे ठेवा. डोळ्यांच्या बाहुल्या कधी उजवीकडे तर कधी डावीकडे हालवा. डोळ्यांची हालचाल करत असताना चेहरा अगदी स्थिर ठेवा. कमीत कमी दोन मिनिटं हे सुरू ठेवा. त्यानंतर मुळ स्थितीमध्ये येऊन चेहऱ्याला आराम द्या. त्यानंतर पुन्हा याचा सराव करा. हे तुम्ही तीन वेळा करू शकता.
चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील दूर
त्वचा नेहमीच आकर्षक आणि सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी मुली वेगवेगळे उपाय देखील करतात. फेशिअल योग प्रकार देखील चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. गालांचा मसाज कसा करावा हे सविस्तर रुपात पाहुया.
– सर्वप्रथम तोंडामध्ये हवा भरत गाल फुगवा.
– आता हाताच्या सहाय्याने फुगलेल्या गालांवर हलक्या हाताने मसाज करा.
– दोन्ही गालांना समान मसाज करा.
– त्यानंतर चेहरा मुळ स्थितीमध्ये आणा.
– यामुळे त्वचेच्या स्नायुंना आराम मिळतो.
– एकाच वेळी तुम्ही ५ वेळा हा प्रकार करू शकता.
वेगवेगळे योग प्रकार
फोटोमध्ये दाखवलेल्या वेगवेगळ्या योग प्रकारामुळे चेहऱ्याला आराम मिळतो. तसचे चेहऱ्यावरील ताण कमी होण्यासही मदत मिळू शकते.
– दोन्ही हातांंच्या तळव्यांमध्ये हनुवटी ठेवा. आता चेहऱ्याच्या खालच्या भागापासून ते वरच्या भागापर्यंत मसाज करा. फेस मसाज करत असताना ही प्रक्रिया तुम्ही वापरू शकता. यामुळे हनुवटीच्या भागावरील त्वचा घट्ट होते.
– त्वचेवरील छिद्र हे खालच्या बाजूला असतात. चेहऱ्याला एखाद्या क्रिम किंवा तेलाने मसाज करत असताना चेहऱ्याच्या खालच्या भागापासून ते वरच्या भागापर्यंत मसाज केल्यास याचा लवकर फरक जाणवतो.
– डोकं आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी दुसऱ्या फोटोप्रमाणे तुम्ही योगप्रकार करू शकता. जीभ बाहेर काढत हातांच्या सहाय्याने दोन्ही बाजूने कपाळ दाबा. जीभ बाहेर काढताना चेहऱ्यावरील स्नायुंवर देखील लक्ष असुद्या. एक मिनिटानंतर पुन्हा हा प्रकार करा. तुम्ही एकाच वेळी तीन वेळा हा प्रकार करू शकता.
जॉ-लाइनसाठी योग प्रकार
जॉ-लाइन तसेच गळ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी फेशिअल योग तुम्ही करू शकता. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे बोटाच्या सहाय्याने हनुवटी वरच्या बाजूला खेचा. एक ते दोन मिनिटं याच स्थितीमध्ये राहा. त्यानंतर पुन्हा मुळ स्थितीमध्ये या. पुन्हा एक ते दोन वेळा तुम्ही हा प्रकार करू शकता. तसेच हलक्या हाताने तुम्ही मानेला मसाज देखील करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला तसेच मानेला देखील आराम मिळतो.
आकर्षक त्वचेसाठी काय कराल?
वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावरील चरबी वाढते. यामुळे चेहऱ्याचा संपूर्ण आकाराच बदलून जातो. तसेच त्वचा देखील वेगळीच दिसू लागते. अशावेळी वरील दिलेल्या फोटोप्रमाणे योग प्रकार करणे गरजेचं आहे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला मध्यभागी एक एक बोट ठेवा. त्यानंतर घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्याच पद्धतीने बोटं चेहऱ्याच्या दोन्ही बाजूने फिरवा. एकदा सरळ दिशेने तर दुसऱ्यांदा उलट्या दिशेने चेहऱ्यावर बोट फिरवा. काही सेकंदाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा प्रकार करा. एकावेळी ३ ते ५ वेळा तुम्ही हा प्रकार करू शकता.
ताण दूर करण्यासाठी नवा उपाय
सध्या वर्क फ्रॉम होममुळे अनेक जणांचा कामाचा ताण वाढला आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे चेहऱ्यावर देखील याचा परिणाम जाणवू लागतो. अधिक ताण असल्यास त्वचेमधील पेशींवरही याचा परिणाम होतो. अशावेळी तणावामध्ये न राहता फेस मसाज करणं उपयुक्त ठरू शकतं. पण त्यापूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे मसल्स वॉर्म-अप करणं गरजेचं आहे. तसेच हलक्या हाताने फेस मसाज करत डोक्यावरील ताण कमी करा. ताण कमी केल्यास तुमचा चेहरा देखील फ्रेश दिसण्यास मदत मिळू शकेल.
इतरांची मदत घ्या
कपाळावरील त्वचा सुंदर दिसावी तसचे डोक्यावरील ताण कमी करता यावा यासाठी तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता. वरील दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इतरांच्या सहाय्याने डोक्याचा मसाज करू शकता. डोळ्यांवरही हलक्या हाताने मसाज करा. ही संपूर्ण मसाज प्रक्रिया म्हणजेच फेशिअल योग आहे. नियमितपणे फेशिअल योग केल्यामुळे त्वचेला भरपूर लाभ मिळतात. त्याचबरोबरीने डोकं देखील शांत राहण्यास मदत मिळते. तसेच मेडिटेशनमुळे देखील त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.