
नागपूर : शहीद भूषण सतई यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीमध्ये काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानशी दोन हात करताना नायक भूषण सतई शहीद झाले होते. भूषण यांच्या जाण्याने कुटुंबावर आधीच दुखाचा डोंगर असताना वडिलांच्या आत्महत्येमुळे मोठं संकट ओढावलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धोंडू सतई असं शहीद भूषण सतई यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. भूषण यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. यातून ते अद्यापही सावरले नव्हते. त्यामुळे अशी टोकाची भूमिका घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. रमेश सतई यांच्या पश्चात पत्नी सरिता सतई, लहान मुलगा लेखनदास सतई आणि मुलगी असं कुटुंब आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं होतं. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.
श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमधील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले.