नांदेड : इच्छा, जिद्द, चिकाटी असेल तर कुठलेही स्वप्न साकार करणं कठीण जात नाही. हे दाखवून दिलं नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावच्या शेतकरी कन्या असलेल्या रेवा जोगदंड हिनं. अवघ्या वयाच्या 14 व्या वर्षी अमेरीकेत विमान उडवलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव आहे आणि या गावातील केशवराव जोगदंड हे शेतकरी कुटुंब राहतं. केशवरावांचा मुलगा दिलीप हा अमेरीकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि त्यांची मुलगी ही रेवा हिने अमेरिकेत अवघ्या 14 व्या वर्षी विमान उडविण्याचं प्रशिक्षण घेतलं. ती स्वतः अमेरिकेत विमान उडवत आहे. याचा व्हिडिओ कोंढा येथील आजोबा केशवराव यांना पाठवला. हा व्हिडिओ पाहून कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.
ग्रामीण भागात विमान दिसलं की कौतुक वाटतं. त्यात जर विमान प्रवास घडला तर त्याहुन कौतुक. मात्र, विमान चालवणं आणि तेही 14 वर्षाच्या मुलीनं हे आश्चर्यच म्हणावं लागलं. गगन भरारी घेतलेल्या या शेतकरी कन्येची बातमी कानावर पडताच रेवाच्या आजी-आजोबांच्या घरी कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी ऐकच गर्दी केली.
रेवानं अवघ्या 14 व्या वर्षी घेतलेल्या विमान भरारीचं जिल्ह्यातच काय तर अमेरिकेतही कौतुक केलं जात आहे. रेवा तिच्या स्वप्नाविषयी विचारलं असता तिला नासामध्ये काम करण्याची इच्छा आहे. रेवानं मिळविलेलं यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.