नांदेड: सत्ता मिळाल्याशिवाय महाराष्ट्राच्या हिताचे काम करणार नाही, अशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका चुकीची आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहात ते आम्हाला सांगा. आम्हीच प्रश्न सोडवतो. तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही. जनतेने तुम्हाला नाकारले आहे. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्व संपवण्याचा खेळ गेली अनेक वर्षे सुरू आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (jayant patil criticizes devendra fadnavis)
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे यु्द्ध पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले होते. आम्हाला सत्ता द्या, मग फक्त ४ महिन्यांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून दाखवतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडवीस यांना जोरदार टोला हाणला आहे.
‘सत्तेत आल्यानंतर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा?’
ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडण्यावण्यासाठी भाजपला सत्तेत येण्याची काय आवश्यकता आहे, असा सवाल उपस्थित करत, हा प्रश्न कसा सोडवणार ते आम्हाला सांगा, आम्ही प्रश्न सोडवू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जनतेने तुम्हाला नाकारले असल्याचेही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.
‘भाजपने ओबीसी चळवळ मारण्याचे काम केले’
सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचं नाही का?, असा प्रश्न उपस्थित करत सत्ता मिळेपर्यंत ओबीसींसाठी काहीच काम करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनीधींची आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पाटील यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. ओबीसींचा इतका कळवला आहे तर मग भुजबळांना तुरुंगात खितपत का ठेवले, एकनाथ खडसे यांच्यासारख्या ओबीसी समाजातील नेत्यांना पक्षाबाहेर पडण्याइतपत परिस्थिती निर्माण केली. भाजपत ओबीसी नेता राहणार नाही अशी भाजपची अंतर्गत भूमिका आहे असे सांगत ओबीसीची चळवळ मारण्याची काम भाजपने केले. आता आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.