[ad_1]
हायलाइट्स:
- आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका
- शरद पवारांना मी मोठा नेता मानत नाही – पडळकर
- तिसऱ्या आघाडीसाठी झालेल्या बैठकीचीही उडवली खिल्ली
पवार कुटुंबीयांवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली आहे. ते बुधवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं होतं, मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असंही ते म्हणाले. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही ते म्हणाले.
वाचा: ‘तारीख पे तारीख आणि पॅकेजवर पॅकेज येत असतात, प्रश्न सुटणार आहेत का?’
‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.
मुंडे किंवा कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष का झाले नाहीत?
‘धोक्यानं जे सरकार आलं, त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, हे ओबीसी का समोर आले नाहीत? सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असा हल्लाबोल पडळकरांनी केला. ‘ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे,’ असा दावाही त्यांनी केला.
‘तिसऱ्या आघाडीची तयारी म्हणजे…’
दिल्लीत शरद पवार यांच्या पुढाकारानं झालेल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीची पडळकरांनी खिल्ली उडवली. ‘तिसऱ्या आघाडीसाठी झालेली बैठक म्हणजे ‘रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’ अशातला प्रकार आहे. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटाही पडळकर यांनी पवारांना काढला.
[ad_2]
Source link