मुंबई : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Mill) मालमत्ता ईडीनं सील केल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेते सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
सीबीआय आणि ईडी या केंद्राच्या हातात आहे. या एजन्सीचा वापर हा राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यासाठी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केली आहे. इतकंच नाहीतर तर ‘एका काय सर्व ४३ कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी. या कारखान्यांच्या विक्रीबाबत चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी कारखान्यांची चौकशी करायची आणि मग भाजपमध्ये घ्यायचं हे चुकीचं आहे. कारण हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत’, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ईडी राजकीय दृष्ट्या काम करत आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी कारखाने लुटल्याच्या अनेक तक्रारी मी केल्या आहेत. ४३ कारखान्यांची लिस्टही ईडीकडे दिली आहे. पण तेव्हा यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण ईडीची आता कारवाई म्हणजे त्यांना कोणीतरी सांगत आहे. एखाद्या माणसाचा त्रास होत असेल तर त्याचा काटा काढण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप
अजित पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तरं दिली. ‘जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देईल,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. जरंडेश्वर कारखान्यानं बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आलं आहे. त्या आधारेच ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरूपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप केला जात आहे.