Home महाराष्ट्र Anna Hazare: साखर कारखान्यांची विक्री; अण्णा हजारेंचे खळबळजनक आरोप

Anna Hazare: साखर कारखान्यांची विक्री; अण्णा हजारेंचे खळबळजनक आरोप

0
Anna Hazare: साखर कारखान्यांची विक्री; अण्णा हजारेंचे खळबळजनक आरोप

अहमदनगर: ‘राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे. कोणता कारखाना कोणाला विकायचा याचे आधीच नियोजन करून संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आला आहे,’ असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केला आहे. ‘आम्हाला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही. आता ईडीने (ED) जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व ४९ कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) मालमत्ता ईडीने सील केली आहे. बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचे राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आले आहे. त्या आधारेच ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यासंबंधी हजारे यांनी पूर्वी तक्रार केली होती. जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर हजारे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हजारे म्हणाले, ‘या गैरप्रकाराशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्वीच आमच्याकडे आलेली आहेत. त्या आधारे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तब्बल चार हजार पानी पुरावा त्यासोबत दिला. मात्र, सरकारने यासंबंधी चौकशी करण्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांनी सोयीचा अहवाल देत या तक्रारीत तथ्य नसल्याचे न्यायालयाला कळविले. या विरोधात आम्ही पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. याच तक्रारीच्या आधारे ईडीने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. त्यांनी आता सर्वांचीच चौकशी करावी,’ असेही हजारे म्हणाले.

राज्य सहकारी बँकेच्या कारभारावर आरोप करताना हजारे म्हणाले, ‘या बँकेची अनेकदा चौकशी झाली आहे. त्यात तथ्य आढळून आल्याने संचालकांवर जबाबदारीही निश्चित करण्यात आली होती. वसुलीही होणार होती. मात्र, सत्ताबदल झाला. हातात सत्ता आल्यावर काय होऊ शकते, ते आपण पहात आहोत. आम्ही ज्या तक्रारी केल्या त्यात तथ्य नाही असे म्हणतात, तर मग तेव्हा हे संचालक मंडळ बरखास्त का झाले होते? यात कोणत्याही पक्षाला दोष द्यायचा नाही. सर्वांनी मिळून संगनमताने हा गैरव्यवहार केला आहे. सहकारी साखर कारखाने बंद पाडून ते विकत घेतले. कोणाला कोणता कारखाना घ्यायचा हेही ठरवून झाले. ज्या महाराष्ट्रात सहकारी चळवळ सुरू झाली, रुजली, त्याच राज्यात हे सगळे घडल्याचे वाईट वाटते. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविली. ती देशात पोहचली, मात्र आज महाराष्ट्रातच ती मोडण्याचे काम सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता ईडीने कारवाई सुरू केलीच आहे, तर न थांबता सर्वच कारखान्यांवर केली जावी,’ असेही हजारे म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here