आळंदी : “दिंडी निघालीय आता थांबणं शक्य नाही , पायी वारी पूर्ण करणारचं ” असं सांगत बंडातात्या कराडकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर बंडातात्यांच्या भूमिकेला पाठींबा देत माऊलींचे परंपरागत चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी देखील पायी वारीची मागणी योग्य असल्याच म्हटलंय. Dindi can’t stop now, it will complete its journey – Bandatatya Karadkar
पायीवारी करण्यासाठी आपण आळंदीत दाखल होणार असा इशारा बंडातात्यांनी दिला होता. त्यानुसार ते आज पोलिसांना गुंगारा देत गमिनी काव्यानं आळंदीत दाखल झाले आणि त्यांनी काही अंतर चालून दिंडीला सुरवात देखील केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि बंडा तात्या कराडकरांनी पायी वारीच्या बाबत माघार घेतल्याचा दावा पोलिसांनी केला.
मात्र पोलीसांनी काहीही दावा केला असला तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत आता निघालेली पायी वारी थांबणार नाही आणि आमची पायीवारी शासकीय नियमांचे पालन करुन पार पडेल. हि पायी वारी पोलीस आणि प्रशासनाला कोणत्याही प्रकारे त्रासदायक ठरणार नसल्याचे बंडातात्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे शासनाने आधीच परवानगी दिली असती तर ही वेळ आलीच नसती,असं सांगत माऊलींचे चोपदार यांनी तात्यांच्या मागणीच समर्थन करत सरकारवर जोरदार टीका केली. माऊलींच्या प्रत्येक वारकऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी चोपदारांची आहे असं म्हणत राजाभाऊ चोपदारांनी कराडकरांच्या पायीवारीला समर्थनच दिले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार असं चित्र निर्माण झालं आहे.
मात्र, कोरोना मुक्त वारी करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीत आता हि पायी वारी निघाली तर, बंडातात्यांच्या या भूमिकेमुळे कोरोना नियमांना गालबोट लागणार का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थिति होत आहे.