मुंबई: बँकेचं कर्ज थकविल्याच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) अभिनेता दिनो मोरिया याच्यावर कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिनो मोरियाचा संबंध मुंबई महापालिकेतील गैरव्यवहाराशी जोडत दिनो मोरिया हा मुंबई महापालिकेतील सचिन वाझे असल्याचा आरोप केला आहे. (BJP MLA Nitesh Rane Targets Dino Morea and Shiv Sena)
गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी एका बँकेचं १४,५०० कोटींचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी दिनो मोरियाचाही संबंध असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं दिनो मोरियाची १.४ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. त्याचबरोबर, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची २.४१ कोटींची मालमत्ता सील केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.
‘दिनो मोरिया हा मुंबई महापालिकेमधील सचिन वाझे आहे. त्याची सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील. आमच्याकडं त्याबाबतचे पुरावे आहेत,’ असा दावाही नीतेश यांनी ट्वीटमध्ये केला आहे.
नीतेश राणे यांनी त्याआधी विधानसभेतील आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात ते मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलताना दिसत आहेत. त्यात त्यांनी दिनो मोरियावर आरोप करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेतील व सरकारशी संबंधित कामं चुटकीसरशी करून देतो, असं लोकांना सांगणारा हा दिनो मोरिया आहे कोण? तो सरकारचा जावई आहे का? कलाकार होता. दोन-चार चित्रपट केले. आता काय करतो? हा कोणाचा मित्र आहे? कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या सारख्याच लोकांच्या माध्यमातून झाला आहे,’ असा आरोपही नीतेश यांनी केला आहे.
[…] दिनो मोरिया हा BMC मधला सचिन वाझे; ‘याR… […]