मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीने शनिवारी (३ जुलै) याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी कोणत्या कारणास्तव चर्चा झाली ? हा मुद्दा अद्याप अनुत्तरितच असताना या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता या राऊत – शेलार भेटीवर काँग्रेसकडून पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. “आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही”, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सोबतच , “भाजपचे नेते भविष्यवाले आहेत”, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे.
संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या भेटीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतो. इथे सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेले आहे. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. म्हणून आम्ही या भेटीला राजकीय भेट असे गृहीत धरत नाही”, तसेच “भाजपचे नेते भविष्यवाले आहेत. मी भविष्यवाला नाही”, असेही म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.