मुंबई (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन
..फडणवीसांना बोलूच दिले नाही
राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा उपलब्ध होण्याचा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. भुजबळांनी फडणवीसांच्या काळात झालेल्या पत्रव्यवहार सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले, परंतु सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे फडणवीस यांनी माइकच फेकून दिला.
या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आला. पण भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव दालनाकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपचे 12 आमदार निलंबित
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना हा गदारोळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बगाडिया या आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झालं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
ओबीसी आरक्षणावरून राडा
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळावा असा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो, मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. परंतु तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितल्यानं भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.