दिल्ली हादरलं! पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचे राजीनामा अस्र! मुंढे अचानक दिल्ली रवाना ! 

0
141

मुंबई: प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्रीपद, त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला खुलासा आणि त्यानंतर मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना दिल्लीच बोलावणं आल्याने त्या अचानक दिल्लीसाठी रवाना झाल्यााचे ऐकण्यात येत आहे. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतरही नेत्यांशी त्यांची चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार असल्याचा कयास होता. नव्हे तर तसं निश्चितही मानलं जात होतं. मात्र, प्रीतम मुंडेंऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला. मात्र, कालपासून पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.


पंकजा मुंडे या दिल्लीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवण्याची चर्चा आहे. प्रत्येकवेळी मुंडे कुटुंबीयांना डावलले जात असल्याचेही त्या नड्डा यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र याच क्षणी बीडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण 14 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचासुद्धा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली.