पणजी : गोव्याच्या दौऱ्यावर नड्डा हे शनिवारी गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी मंत्री, आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विविध विकासकामांची पहाणीही केली. त्यानंतर रविवारी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत घोषणा केली. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांनी पक्षांतर्गत हेवेदावे अन् नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चोहोबाजूने विकास होत आहे. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांनाच पुढे करणार आहोत. भाजपमध्ये संसदीय मंडळाकडून अधिकृत घोषणा केली जाईल. पण इतर कोणत्याही नावाचा विचार करण्याची सध्या गरज नाही, अशा शब्दांत नड्डा यांनी सावंत यांच्या नावाला पसंती दर्शवली.
गोव्याचे कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली. मागील साडे चार वर्षांत गोव्यामध्ये भाजपमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मी याबाबत खूप समाधानी असून आत्मविश्वास आला आहे. काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. त्यांनीही भाजपच्या कामाचं कौतूक केलं आहे, असं नड्डा म्हणाले.
सावंत यांनी मार्च 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला 40 पैकी 30 जागा मिळतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. सरकारच्या कामगिरीमुळे हे शक्य होणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे. पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापैकी गोवा हे एक राज्य आहे.