“भास्कर जाधव,जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

0
110

मुंबई : कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काहींचे संसार डोळ्यादेखत वाहून गेले. दरम्यान, याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका महिलेने हंबरडा फोडत  तिचे दुःख मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. ‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’, अशी विनवणी तिने केली. मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असे  मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितले. तसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला उद्या भेट असेही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचे कॅमेरांनी टिपले.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिला आहे. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

या महिलेने सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधव यांनी महिलेला, “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,” असे म्हटले आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, “तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,” अशी प्रतिक्रिया दिली. याच व्हिडीओवरुन आता विरोधक भास्कर जाधवांवर टीका करताना दिसत आहेत.

Source link