सविंदणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय पुढारी आणि इच्छुक उमेदवार करोनाचे नियम पायदळी तुडवून दशक्रिया विधी, मंगल कार्यालये तसेच सांत्वन भेटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गर्दी करून
आपली प्रसिद्धी करताना दिसून येत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील अनेक गावांत करोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
काही महीन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच दशक्रियाघाट व मंगल कार्यालयामध्ये ही भावी इच्छुक उमेदवार आपल्या भाषणातून प्रचार आणि दुसऱ्यांवर टीका करताना दिसून येत आहे.सध्या बेट भागात सुनिता गावडे, राजेंद्र गावडे यांसह अरूणा घोडे, प्रभाकर गावडे हे राष्ट्रवादी मधूनच इच्छुक आहेत.
तर भाजपकडून अशोक माशेरे व सवित्रा थोरात, शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे हे आपली प्रचार यंत्रणा लग्नसोहळा, दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हजेरी लावून सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका टिपण्णी करीत असल्याचे दिसून येत आहे.
करोनाची तिसरी लाट लक्षात घेवून महसूल व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष ठेवून दशक्रिया विधी व विवाह सोहळ्यांवर जास्त गर्दी जमवल्यास कारवाई करणे गरजेचे आहे.
सध्या हे कार्यक्रम करोनाची केंद्र बनत आहेत. बेट भागात यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या या राजकीय भाषणांना नागरिक मात्र कंटाळले असून सर्वसामान्य लोकांसाठी हाच चर्चेचा विषय बनला आहे.