भाजपाने केला शिवसेनेवर सर्जिकल स्ट्राईक ; प्रमोद जठारांचा शिवसेनेला राजापुरात मोठा दणका….!!

0
54

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

 

आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सागवे विभागातील सुमारे ७० ते ८० शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हे कोणी सामान्य शिवसैनिक नव्हेत, मागची अनेक वर्षे सातत्याने शिवसेनेच्या संघटनात्मक कामात वाघासारखे भिडणारे शिवसैनिक आहेत. राजा काजवेसारखे प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात घडलेले शिवसैनिक आहेत. रिफायनरीच्या प्रश्नावर बंडाचा झेंडा उठवत धगधगता संघर्ष करत आंदोलन उभे करणारे पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासारखे अग्निकुंड आहेत. एकेक पदाधिकारी हा ढाण्या वाघच आहे.

विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडे कोकणच्या युवकांसाठी काही पर्याय उरलेला नाही, कोणतेही व्हिजन नाही, फक्त झेंडा नाचवण्यासाठी बेकार तरुणांची फौज शिवसेनेला निर्माण करायची आहे, याबद्दलचा राग या शिवसैनिकांच्या मनात घुमसत होता. शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीला, खासदार आमदार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळत त्यांनी सध्याच्या शिवसेनेतली  वरिष्ठ नेतेमंडळी आता बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत कोकणचे नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा महाराष्ट्र राज्य सचिव आणि रत्नागिरी जिल्हा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजप प्रवेश करत असल्याचे म्हंटले आहे.

भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या शिवसैनिकांमध्ये प्रामुख्याने माजी विभागप्रमुख राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, सुहास कुवरे, राजू वेलणकर, शिवा वेतकर, बाबू मेस्त्री, भाई देसाई यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे.

मागील काही दिवस भाजपा नेते रविंद्र चव्हाण, निलेश राणे,  प्रमोद जठार काहीसे शांत होते, तेव्हाच या वादळाची पूर्वसूचना मिळत होती. अखेर आज रत्नागिरीत शिवसेनेवर सर्जिकल स्ट्राईक झालाच. आजच्या कार्यक्रमाला नियोजनानुसार माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित राहणार होते, पण कार्यक्रमातील बदलामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. येणाऱ्या काळात शिवसेनेला याहूनही “जोर का झटका जोर से ही” लागणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.