मुंबईत शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपची व्यूहरचना

0
25

मुंबई – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून त्याचाच भाग म्हणून सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपही चांगलीच सक्रिय झाली आहे.

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प पक्षाने केला असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

शेलार म्हणाले की, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत.

सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.

निवडणुका योग्य वेळी झाल्या पाहिजेत. त्या होत नसतील तर कारण काय? आणि त्याबाबतची स्पष्टता जोपर्यंत जनता आणि आमच्यासमोर येणार नाही तोवर याबाबत प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. पण सर्वसाधारणपणे मुंबई महापालिकाच्या निवडणुका वेळेत होणं हे कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सर्व पावलं उशिराने टाकत आहे का? असा आमच्यासमोर प्रश्न आहे, असंही शेलार म्हणाले.

Facebook Notice for EU! You need to login to view and post FB Comments!