Thursday, June 17, 2021
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'वाघ' पंजाही मारू शकतो!; छगन भुजबळ यांचा भाजपला सूचक इशारा

‘वाघ’ पंजाही मारू शकतो!; छगन भुजबळ यांचा भाजपला सूचक इशारा

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेनेने भाजपविरोधात मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. परंतु, मैत्री कोणाशी करायची हे ‘वाघा’च्या मनावर असते, ‘वाघ’ पंजाही मारू शकतो, असा टोला हाणत सूचक इशाराच भुजबळ यांनी भाजपला दिला. ( Chhagan Bhujbal On Shiv Sena BJP Alliance )

नाशिक येथे भुजबळांनी नवी मुंबई विमानतळाचा वाद, शरद पवार-प्रशांत किशोर भेट, भाजप-शिवसेना ज‌वळीक, करोना मृत्यू आणि मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. नवी मुंबई विमानतळाच्या वादावर बोलताना शिवसेनेला आस्तेकदम जाण्याचा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच नवी मुंबई विमानतळास स्वत:चे नाव देण्यास नकार देऊन जेआरडी टाटा यांचे नाव देण्याचे सुचविले असते, असे भुजबळ म्हणाले. बाळासाहेब आणि दि. बा. पाटील या दोघांच्याही नावाला आमचा पाठिंबाच आहे, असे सांगून ते म्हणाले की, नामकरणाचा वाद एकत्र बसवून सोडविण्याची गरज आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी करोनाच्या काळात आंदोलन करावे की नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु, ते शाहू, फुले, आंबेडकरांचे भक्त आहेत, संयमी नेते आहेत. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीत याची ते पुरेपूर काळजी घेतील, असे सांगून भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात सुटणार असल्याने या विषयावरून विचलित होण्याची गरज नसल्याचे नमूद केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कशासाठी भेट घेतली हे आपल्याला माहिती नाही. परंतु, त्यांनी पवारांना सल्ला दिला तर पवार नक्की ऐकतील, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी करोनाबळींच्या आकडेवारीत घोळ आहे. त्यामुळे करोनाबळींची संख्या लपविली गेली, की यात काही घोळ आहे, याचा शोध घेणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात नेमका काय घोळ आहे, नेमकी चूक कोणाची आहे याची सखोल माहिती घेणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW