जनावरांमध्ये धोकादायक “ओ’ व्हेरीएंट

0
51

पुणे – राज्यासह देशात मागील दीड वर्षांपासून करोनाचे संकट आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यात जनावरांमध्येही विषाणुजन्य लाळ्याखुरकत आणि लंम्पी आजाराचा उद्रेक झाला आहे. 

लंम्पी आजारावर लस उपलब्ध नसल्याने पशुपालक धास्तावले आहे. लाळ्याखुरकत रोगावरील लस उपलब्ध असली तरी लसीकरण संथ गतीने होत आहे. मंगळवारी डाळज येथे एकाच गोठ्यातील 11 जनावरांचा मृत्यू झाला. या जनावरांत अत्यंत धोकादायक असलेला “ओ’ व्हेरीएंट आढळला आहे.

जिल्ह्यात जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. 30 लाखांहून अधिक गायवर्ग आणि म्हैस वर्गातील पशुधन आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह या जनावरांवर आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बदललेले वातावरण आणि सतत होत असलेलेल्या पावसामुळे जनावरांनाही विषाणूजन्य आजारांची लागण होत आहे.

लाळ्याखुरकत आणि लंम्पी हा अंत्यत घातक आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. लाळ्याखुरकत आजारामुळे खेड, मावळ, मुळशी तालुुक्‍यात मोठ्या प्रमाणात जनावरांना या आजारांची लागण झाली आहे. आतापर्यंत खेड आणि बारामती तालुक्‍यात पशुपालकांचे पशुधन या रोगांमुळे दगावली आहेत. या मुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात लाळ्याखुरकत रोगावरील लस आली. जवळपास 10 लाख डोस जिल्ह्याला मिळाले. सध्या याचे लसीकरण सुरू आहे. मात्र, हे लसीकरण संथ होत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.

लाळ्याखुरकत आजारामध्ये जनावरांच्या तोंडात जखमा होत असल्याने त्यांना खाताना अडचणी निर्माण होतात. यामुळे ती दगावतात. लंम्पी या आजारात जनावरांच्या अंगावर गाठी येतात. काही दिवसांनी त्याच्या जखमा होतात. त्यामुळे जनावरे दगावतात.

जनावरांमध्ये आढळणारा हा सर्वात घातक रोग आहे. यावर अजुनही लस आलेली नाही. सध्या या आजारावर शेळ्यांना होणाऱ्या देवीच्या आजारावरील लस दिली जात आहे. जिल्ह्याला याचे 71 हजार 200 डोस मिळाले आहे. असे असले तरी अनेक तालुक्‍यात ही लस अद्यापही उपलब्ध न झाल्याने ती त्वरित देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.

डाळज येथील जनावरांना निमोनिया
डाळज येथे एकाच पशुपालकांची 11 जनावरे लाळ्याखुरकत रोगाने दगावली. या जनावरांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या जनावरांना निमोनिया झाल्याचे आढळले. तसेच लाळ्याखुरकतचा सर्वात धोकादायक असलेला “ओ’ व्हेरिएंट सापडला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.

लाळ्याखुरकत आणि लंम्पीचा वाढता प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. पशुपालकांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी. डाळज येथील शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने त्याला प्रत्येक जनावारामागे जिल्हा परिषदेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 15 हजार रूपये देणार आहे.
– बाबुराव वायकर, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती