[ad_1]

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलन जून महिन्यात 92,849 कोटी रुपयांवर आले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे, 9 महिन्यांत प्रथमच इतकी म्हणजेच 1 लाख कोटींच्या खाली घसरण झाली आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मात्र, जूनचा जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत दोन टक्क्यांनी अधिक आहे.

जून 2021 मध्ये 92,849 कोटी रुपयांची सकल वस्तु आणि सेवा कर-जीएसटीची महसुल वसुली झाली आहे. यात सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीएसटी 49,079 कोटी रुपये, (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या 25,762 कोटी रुपयांसह) आणि उपकर 6,949 कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या 809 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. या आकडेवारीत 5 जून ते 5 जुलै 2021 दरम्यान देशांतर्गत व्यवहाराच्या माध्यमातून वसुली झालेल्या जीएसटी महसुलाचा समावेश आहे. कारण, कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मे-2021 साठी परतावा भरण्याकरता 15 दिवसांच्या विलंबासह व्याजात सूट/व्याजासंदर्भात विविध सवलती दिल्या होत्या.

या महीन्यात सरकारने नियमित तोडग्याच्या रूपात 19,286 कोटी रुपये सीजीएसटी आणि 16,939 कोटी रुपये एसजीएसटीतून आयजीएसटी असा तोडगा काढला. जून 2021 ची महसुल वसूली गेल्या वर्षीच्या या महिन्यातील महसुल वसुलीपेक्षा 2 टक्के अधिक आहे. जीएसटी महसुल सलग आठ महीने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे . जून, 2021 मधला जीएसटी महसुल मे 2021 मधे झालेल्या व्यावसायिक व्यवहाराशी संबंधित आहे. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये / केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महीन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता लक्षात येते की एप्रिल 2021 मधील 5.88 कोटींच्या तुलनेत मे महीन्यात 3.99 कोटी ई-वे बिल तयार झाले, जे 30 टक्क्यांहून कमी आहे.

कोविड रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे जून 2021 मधे 5.5 कोटी ई-वे बिल तयार केले गेले. व्यापार आणि व्यवसाय रुळावर येत असल्याचेच हे निदर्शक आहे. एप्रिल 2021च्या पहिल्या दोन आठवड्यात दिवसाला सरासरी 20 लाख ई-वे बिल तयार होत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते घटून 16 लाख आणि 9 ते 22 मे दरम्यान दोन आठवड्यात आणखी घट होऊन 12 लाख झाले. यानंतर ई-वे बिल तयार होण्याची सरासरी वाढत असून 20 जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात ती पुन्हा 20 लाखाच्या पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे जून महीन्यात जीएसटी महसुलात घट दिसून आली असली तरी जुलै 2021 पासून जीएसटी महसुलात पुन्हा वाढ दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

[ad_2]
Source link