नवी दिल्ली : देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड 19 योध्यांसाठीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. केंद्र सरकारने सुरु केलेला हा क्रॅश कोर्स 26 राज्यांतील 111 केंद्राच्या माध्यमातून अमलात आणण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या क्रॅश कोर्सची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांच्या सहाय्याने केंद्र सरकारने हा क्रॅश कोर्स तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यात एक लाख युवकांना प्रशिक्षत करण्यात येणार आहे.”
स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग
या क्रॅश कोर्समध्ये सहा प्रकारचे विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन उर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्यासाठी पंतप्रधानांनी देशातील युवकांना स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंगचा मंत्र दिला.
स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंगची गरज लक्षात घेता या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कौशल्य मंत्रालयाची स्थापना केली आहे असं पंतप्रधान म्हणाले. तत्रज्ञान वेगाने बदलतंय, त्यावेळी आपण त्यानुसार बदल आवश्यक असल्याचं सांगत अपस्किलिंग ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. त्यासाठी देशात स्किल इंडिया मिशन सुरु केलं तसंच आयटीआयच्या संख्येतही वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
Prime Minister Narendra Modi launches six customized crash course programme for #COVID19 frontline workers under Skill India via video conferencing pic.twitter.com/NozRn6iPKm
— ANI (@ANI) June 18, 2021
येत्या 21 जूनपासून व्यापक लसीकरण
देशात येत्या 21 जूनपासून व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून त्यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरणाचा कार्यक्रम हा देशातील कानाकोपऱ्यात पोहचवला असं सांगत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या :