ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

0
21

नागपूर (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यातील अनलॉकवरून महाविकास आघाडी सरकारच्या संभ्रमावस्थेमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला आहे. अनेक जण स्वत:ला मुख्यमंत्री समजून निर्णय जाहीर करत असून केवळ श्रेय मिळण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अनलॉकच्या गोंधळावर टीका केली. राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. सरकारमध्ये धोरणात्मक निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. एखाद्यावेळी मुख्यमंत्री स्वत: अशा घोषणेसाठी मंत्र्यांची नेमणूक करतात, ते मंत्रीही त्यानुसारच भाष्य करतात. परंतु या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच-पाच मंत्री घोषणा करत असल्याची टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे श्रेय मिळवण्यासाठी प्रत्येक जण ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत. हे यापूर्वीही अनेकदा घडलं आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून ठोस माहिती सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आठ वेळा तारीख वाढवून घेतली. मात्र काहीच केले नाही. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांतील ओबीसींचे सगळेच आरक्षण गेले. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकारने तेच केले. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा आहे असे जरी गृहीत धरले, तरी राज्य सरकारला मागासवर्ग आयोग स्थापून कॅबिनेटमध्ये त्या समाजाला मागास दर्जा देऊन तसा प्रस्ताव केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागतो, परंतु या सरकारने हेही केले नाही. या सरकारला मुळात मराठा समाजालाही आरक्षण द्यायचे नाही, कारण ज्याला काम करायचे असते तो कारणं सांगत बसत नाही, असा आरोपही विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला.