पुणे हादरलं! घरात घुसलेल्या तरुणाला ‘दृश्यम’ स्टाईलने संपवलं; असा गायब केला मृतदेह

0
88

शिरूर, 11 जून: पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती याठिकाणी एका तरुणाची दृश्यम स्टाईलने हत्या (Drushyam Style Murder Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या वेळी घरात शिरल्याचा राग मनात धरून आरोपी बापलेकांनी तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी दृश्यम चित्रपटाप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मात्र सखोल तपासणीनंतर पोलिसांनी 25 दिवसांनी या हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांसह वडिलांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

आषिशकुमार सुभाषचंद्रकुमार गौतम असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय-41) आणि रियाज इस्लाम सम्मानी (वय-20) असं अटक केलेल्या आरोपींची नावं असून पोलिसांनी आरोपी इस्लामच्या अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे. संबंधित मृत तरुण 17 मे पासून हा बेपत्ता होता. याप्रकरणी मृत तरुणाचा चुलत भाऊ अविनाश रामब्रिश कुमार याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. संबंधित तरुणासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आधीपासूनचं होता. याप्रकरणी चौकशी करत असताना, पोलिसांनी 25 दिवसांनंतर हत्येचा उलगडा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गौतम 17 मे रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास इस्लाम यांच्या घरात शिरला होता. दरम्यान इस्लामला जाग आली. यावेळी आरोपी इस्लामने आपल्या दोन मुलांना (एक अल्पवयीन) जागं करून गौतमला लाकडी दांड्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. या भयंकर मारहाणीत गौतमचा जागीचं मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी गौतमचा मृतदेह ढोकसांगवी जवळील परिटवाडी रस्त्याच्या पुलाखाली सिमेंटच्या नळीमध्ये टाकला. आरोपींनी हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

एका स्थानिक खबऱ्याद्वारे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानं पोलिसांना हत्येचा उलगडा करणं शक्य झालं आहे. संबंधित तरुण घरात का शिरला होता? याची पुष्टी अद्याप झाली नसून पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

Source link